समाज विकास विभाग

Select WOMEN AND CHILD WELFARE LAWS

महिला व बालकल्याण योजना 

पुणे महानगरपालिकेच्या समाजकल्याण योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१) प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२) तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३) समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४


 

१) महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षणः
पुणे महानगरपालिकेतर्फे १५ ते ४५ वयोगटातील मुली व महिलांसाठी विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यावेळी त्यांना या प्रशिक्षण कालावधीत टूल किट व जाण्या-येण्याच्या खर्चासाठी मासिक बस पास खर्च दिला जातो. यासाठी   ५०० रुपयांची  अनामत रक्कम भरावी लागते. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर अनामत रक्कम परत केली जाते. 

 

२) महिलांसाठी स्वयंरोजगार योजनाः
याअंतर्गत पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणजेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

 

३) मुलगी दत्तक योजना(लाडकी लेक दत्तक योजना)
महिलांचे प्रमाण वाढावे व स्त्री भ्रूण हत्या रोखली जावी यासाठी पुणे महानगरपालिकेने ' मुलगी दत्तक योजना' सुरु केली आहे. याअंतर्गत, एप्रिल २०१३ नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीमागे लोकसहभागातून रक्कम १०, ००० रुपये व महानगरपालिकेचे २०, ००० रुपये असे एकुण रु. ३०, ००० राष्ट्रीयीकृत बँकेत दामदुप्पट योजनेमध्ये ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे, या योजनेअंतर्गत पालकाने एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास पालकाने स्वतः किंवा लोकसहभागातून जमा केलेली रक्कम १०, ००० रुपये व पुणे महानगरपालिकेची रक्कम ४०, ००० रुपये असे एकुण ५०, ००० रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविण्यात येतील. सदरची रक्कम लाडक्या लेकीच्या लग्नासाठी, उच्च शिक्षणासाठी व भवितव्यासाठी वापरता येईल. 

 

४) महिला स्वसंरक्षणः
पुणे  महानगरपालिकेतर्फे १५ ते २५ वयोगटातील युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी  पुणे महानगरपालिकेने शासन निर्देशानुसार १५ ते २५ वयोगटातील महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी विभागाअंतर्गत शासनमान्य संस्थांचे प्रस्ताव मागवून प्रशिक्षण देणेबाबत धोरण तयार केले  आहे. सध्या प्रशिक्षित मास्टर ट्रेनरमार्फत शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत प्रशिक्षण दिले जाते. यानंतरच्या टप्प्यात  वस्ती पातळीवर कायमस्वरुपी वर्ग सुरु केले जाणार आहेत.

 

५) महिला सक्षमीकरण विधवा अनुदानः
या योजनेअंतर्गत अचानक वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांना रु. १०, ००० अर्थसहाय्य देण्यात येते.

 

६) महिलांसाठी पथदर्शी इनक्युबेशन सेंटर उभारणेः
पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, मार्केटिंग, कौशल्य, विक्री व्यवस्थापन, पॅकेजिंग. ब्रँडींग, कारखान्यांना भेटी, उद्योगसंधी, ग्रुप चर्चा याविषयी प्रशिक्षण दिले जाते.

 

७) शहरात महिला सबलीकरण केंद्र उभारणेः
कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन, समुपदेशन(विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार इ.), महिलाविषयक काम करणाऱ्या संस्थांची माहिती, महिला दक्षता कमिटी संदर्भात माहिती, शिवाजीनगर न्यायालय वैकल्पिक वाद निवारण केंद्रांची माहिती, दबावगट निर्मितीसाठी मार्गदर्शन, स्वसंरक्षण प्रशिक्षण, समाज विकास विभागाच्या महिलांसाठीच्या सर्व योजना, म.न.पा. आरोग्य विभागाच्या महिलांसाठीच्या सर्व योजना, महिलांचे संघटीकरण, समाजातील लोकांची मानसिकता बदलणे, आर्थिक सक्षमीकरण, स्त्री अस्तित्वाची ओळख, महिलांमधील निर्णय क्षमता, उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन, महिलांनी स्वतः घ्यावयाची काळजी, शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या पातळीवर १५ महिला सबलीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

 

८) कन्यारत्न योजनाः 
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींकरीता सुरु करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीची नोंदणी कन्यारत्न म्हणून तिच्या पहिल्या वाढदिवसाअगोदर करण्यात येईल. यानंतर पाचवी पास झाल्यानंतर मुलीला २००० रुपये तर ८ वी पास झाल्यानंतर ४००० रुपये अनुदान दिले जाते. त्यानंतर १० वी पास झाल्यानंतर ७५०० रुपये अनुदान दिले जाते. यानंतर इ. ११ वी १२ वी शिकत असताना मुलीला दरमहा २०० रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय, १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी १, ००, ००० रुपये दिले जातात.

 

९) बाल विकास केंद्रः
६ ते १३ वयोगटातील मुलामुलींसाठी बाल विकास केंद्र बचत गटांच्या सहकार्याने १० महिने चालविले जाते. यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास, गाणी, गोष्टी इत्यादीमार्फत केला जातो.

 

१०) महिलांसाठी उद्योजकता विकास शिबीरः
१८ ते ४५ वयोगटातील महिलांना विविध रोजगारांच्या व प्रशिक्षणाच्या उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन केले जाते.

 

११) योगासन वर्गः
महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांच्या मागणीनुसार झोपडपट्टीत नव्याने योगासन वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. हे वर्ग सकाळ व दुपारच्या सत्रात चालविले जातात. २० महिलांनी मागणी केल्यानंतर योगासन वर्ग सुरु केला जातो व योग शिक्षिकेला २००० रुपये मानधन दिले जाते. योग शिक्षिकेला प्रत्येक महिलेकडून २० रुपये शुल्क आकारण्यास परवानगी आहे.  

 

१२) दहावीतील विद्यार्थिनींना खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्यः
इयत्ता नववीत ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना इयत्ता दहावीसाठी खाजगी क्लासकरिता २००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.

 

१३) बारावीतील विद्यार्थिनींना खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्यः
इयत्ता ११ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थिनींना खाजगी क्लाससाठी १०, ००० रुपयांपर्यंतची फी दिली जाते.

 

१४) सी.ई.टी. परिक्षेसाठी अर्थसहाय्यः
प्रत्येक लाभार्थीला सी.ई.टी. परिक्षेच्या तयारीसाठी १०, ००० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. मात्र, विद्यार्थिनींना खासगी क्लास किंवा सी.ई.टी. यापैकी एका योजनेचा लाभ घेत येईल.

 

१५) उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्यः
वैद्यकीय, संगणकविषयक, इंजिनिअरिंग, एम.बी.ए., पदवी व तत्सम शासनमान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाच्या पुर्ण कालावधीत दरवर्षी १०, ००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 

१६) कमवा व शिकाः
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणींना कमवा व शिका योजनेअंतर्गत दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी विद्यार्थिनींना दररोज दोन तास समाजासाठी काम करावे लागते. उदाहरणार्थ, प्रौढ शिक्षण वर्ग घेणे इत्यादी

 

१७) माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनीसाठी शैक्षणिक साहित्यः
महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी शाळेच्या मागणीनुसार दरवर्षी शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.

 

१८) अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी व्यवसाय प्रशिक्षण योजनाः
अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलांकरिता बुधवार पेठ येथे स्पोकन इंग्लिश, केटरिंग(विविध प्रकारचे मसाले तयार करणे इ. प्रशिक्षण), बेसिक व एडव्हान्स शिवण काम या तीन विषयांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. 
 

बचत गटांसाठीच्या योजना
१) बचत गटांसाठी फिरता निधी
पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाअंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांच्या स्थापनेला १ वर्ष पुर्ण झाल्यानंतर या बचत गटांना प्रत्येक सभासदाप्रमाणे रु.१००० एवढा फिरता निधी दिला जातो. याशिवाय, जास्तीत जास्त २०, ००० रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य एकदाच दिले जाते.

२) बचत गटांना प्रदर्शन व विक्रीसाठी अर्थसहाय्य
सदर योजना नागरवस्ती योजनेमार्फत पुरस्कृत बचत गटातील सभासदांसाठी आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या बचतगटांना किमान एक वर्ष पुर्ण झालेले असणे आवश्यक असून बचतगटांचा व्यवहार नियमित सुरु असावा. दरवर्षी साधारणतः १००० गट विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होतात. शासनाने किंवा सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शन व विक्रीसाठी येणाऱ्या खर्चाचे ८० टक्के अनुदान किंवा किमान ५००० रुपयांपर्यंतचे भाडे देता येईल.

३) कागदी पिशव्या तयार करणाऱ्या बचत गटांना प्रशिक्षण
बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

४) शेजार समुह गटात जनजागृतीसाठी विविध आरोग्यविषयक, शैक्षणिक, सामाजिक इत्याद विषयांवर कार्यक्रम आयोजित करुन माहिती देणे.

५) बचत गटातील महिलांनी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास अनुदान
एका मुलीवर १०, ००० रुपये व दोन मुलींवर ५००० रुपये प्रमाणे रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वैकल्पित ग्रोथ फंडात १८ वर्षांच्या मुदतीसाठी गुंतविण्यात येणार आहे. सदर रक्कम १९ वर्षे पुर्ण झाल्याशिवाय काढता येणार नाही. १८ वर्षे पुर्ण होण्याच्या आत मुलीचे लग्न केल्यास रक्कम महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येईल.