पुणे - पंढरपूर - पुणे सायकल वारी

पर्यावरणरक्षणाच्या दृष्टिने प्रदूषणमुक्त प्रवास म्हणून सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच सायकल प्रवासाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीच्या निमित्ताने पुणे ते पंढरपूर ते पुणे अशा अनोख्या सायकल प्रवासाची सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे.

दिनांक २२ व २३ जून २०१९ रोजी पुणे महानगरपालिका, इंडो ऍथलेटिक सोसायटी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे स्मार्ट सिटी, पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लि., महामेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण यांचे संयुक्त विद्यमाने पुणे - पंढरपूर - पुणे अशी सायकलवारी आयोजित करण्यात आलेली आहे. या वारीमध्ये सुमारे ५०० हून अधिक सायकल वारकरी सहभागी होणार आहेत.

पुणे शहरातून अशाप्रकारे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलवारी निघत आहे. इंडो ऍथलेटिक सोसायटीचे सायकलवारीचे हे चौथे वर्ष असले तरी ५०० हून अधिक सायकलस्वार ही आतापर्यंतची ऐतिहासिक गोष्ट आहे. पंढरपूरला वारीबरोबर वेळेअभावी चालत जाणे शक्य नसले तरी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता सायकलने पंढरपूरला जाणेचा सायकल वारकर्‍यांचा हा प्रयोग अल्पावधीत यशस्वी होवून ही सायकलवारी संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाचे आकर्षण होणार आहे.  भविष्यात देशातील वारक-यांबरोबरच जगभरातील सायकल वारकरी यात सहभागी होतील व २ दिवसात ४७० कि.मी. सायकल चालविणेचे आव्हान स्वीकारतील याची खात्री आहे.


या सायकलवारीचा मार्ग खालीलप्रमाणे असणार आहे.

दिनांक २२ जून २०१९ (पहिला दिवस)

पहाटे ४ वाजता प्रस्थान

मार्ग - देहू - आकुर्डी - खडकी - हडपसर - कुरकुंभ - इंदापूर - टेंभूर्णी नाका - पंढरपूर

(सायकल वारकरी सायंकाळी अंदाजे ७.०० वाजता पंढरपूर येथे पोहचतील)

देहू - आकुर्डी - कासारवाडी - येरवडा - हडपसर मधील सर्व सायकलिस्ट पहाटे ५ वाजेपर्यंत मगरपट्टा हडपसर येथील पूलाचे खाली  शनिवार दिनांक २२ जून २०१९ रोजी जमतील वाटेने प्रवास सुरू होईल. पुढे चौफुला ५० किलोमीटर नंतर पहिला थांबा असेल तेथे चहा व नाश्ता होईल व पुढील प्रवास होईल.


दिनांक २३ जून २०१९ (दुसरा दिवस)

पहाटे विठुरायाचे दर्शन घेवून सकाळी ६.०० वाजता परतीचा प्रवास

पंढरपूर - माळशिरस - नातेपुते - फलटण - लोणंद - जेजुरी - सासवड - हडपसर - आकुर्डी

सायकल वारकरी दिनांक २२ व २३ जून २०१९ रोजी सायकल वारीमध्ये इंधनरहित वाहनांचा म्हणजेच सायकलचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरण संतुलन राखणे तसेच सायकल चालविणे मानवी आरोग्यास उपयुक्त असल्याने नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा असा प्रचार करणार आहेत. याबरोबरच सायकल वारकरी मार्गाच्या कडेने झाडांच्या  बिया टाकणार असून त्यापासून मोठ्या प्रमाणात झाडे उगवून पर्यावरणाचे रक्षण होणेस मदत होईल. याशिवाय स्वच्छ भारत अभियान महत्व व  जागतिक लोकसंख्या याविषयीही प्रचार करणार आहे.

सायकल चालविल्यामुळले सायकल चालविणा-या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहून पर्यावरण संरक्षण देखील होणार आहे.