महिला बालकल्याण समिती मार्फत प्रकाशित ई - बुक

 

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर उपस्थित होत्या. रेणूताईंनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. "मनपाच्या एखाद्या प्रकल्पात असं सृजनशील काम होत असल्याचे कौतुक वाटल्याने त्याचे ई-बुक करावे असे वाटले. त्याला सर्वांची साथ मिळाल्यामुळे आज गुपी गाईन, बागा बाईन चे प्रकाशन होत आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करते." असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

 

अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आपण आयुष्यभर सतत शिकत राहिले पाहिजे" असे त्या म्हणाल्या. "कोणतेही समाजोपयोगी काम असेल तर ते सगळ्यांच्या सहकार्याने सतत पुढे नेले पाहिजे" असेही त्यांनी सांगितले. "खेळ खेळणं आणि गोष्टी ऐकायला मिळतं हा मुलांचा हक्क आहे. आणि तो त्यांना मिळेल असं पाहणं हे आपणा जबाबदार प्रौढांचं कर्तव्य आहे. समाजातली सगळी मुलं आनंदी राहिली पाहिजेत." असे प्रतिपादन रेणूताई गावस्कर यांनी केले.

 

लॉकडाऊनच्या काळात एक थेरपी म्हणून रेणूताईंनी मुलांसाठी कथाकथनाचा उपयोग केला. त्या गोष्टींपैकी मुलांना भावलेल्या एका गोष्टीवर त्यांनी हस्तलिखित पुस्तक बनविले. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी माधुरी सहस्रबुद्धे यांनी या ई-बुक ची निर्मिती केली. या उपक्रमाला महिला व बालकल्याण समितीतील सर्व सहकाऱ्यांची साथ लाभली असे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी नमूद केले. ज्या मुलांनी पुस्तकाच्या निर्मितीत भाग घेतला त्यांना नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याकडून गोष्टींच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.


यावेळी महिला बालकल्याण समिती उपाध्यक्षा वृषाली चौधरी, समिती सदस्या श्वेता गलांडे- खोसे तसेच अनिता कदम या आवर्जून उपस्थित होत्या. समाजकल्याण उपायुक्त रंजना गगे,श्री. रामदास चव्हाण, राहुल म्हस्के, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री. अजय उमंदे यांचे सहकार्य लाभले. घरटं प्रकल्पाच्या संचालिका इंद्रायणी गावस्कर व सहकारी तसेच पुस्तकनिर्मितीत सहभागी असलेले बालचमू प्रकाशनाला उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेत झाला सुजाण पालकत्वाचा जागर

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुजाण पालकत्व - शास्त्र आणि व्यवहार या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेत झाले.

 

गेल्या वर्षी ( सन २०२०-२०२१ ) महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा असतांना माधुरी सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकाची कल्पनामांडली. त्याचे लेखन मानसतज्ञ डॉ. श्यामला वनारसे व माध्यमतज्ञ सुषमा दातार यांनी केले आहे.

 

यावेळी प्रास्ताविक करताना सौ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले, "पालकत्व हे शास्त्र आहे, तसेच ती एक कला आहे. शास्त्राला व्यवहाराची जोड दिली कि आपण चांगले पालक बनू शकतो. पालक प्रशिक्षण आपल्याकडे सहजी उपलब्ध होत नाही म्हणून मी हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. पालकांना वेळोवेळी उपयोगी पडतील अशा मार्गदर्शक तत्त्वांचा यात समावेश आहे."

 

"सुजाण पालकत्वासाठी मूल होण्याआधीपासूनच तयारी करावी लागते. पालकत्व निभावताना धीर धरण्याची तयारी लागते. मुलांवर विश्वास ठेवणे, मुलांशी संवाद चालू ठेवणे, चुका करण्याचं स्वातंत्र्य देणे तसेच चुका सुधारण्याची संधी देणे या बाबी महत्वाच्या आहेत." असे डॉ श्यामला वनारसे यांनी याप्रसंगी सांगितले. "मुलांना अनुभव घेऊ देणे, त्यांची झुंज त्यांनाच लढू देणे यामुळे मुले सक्षम बनतात. सगळ्याची तयार उत्तरं त्यांना देऊ नका" असेही त्या पुढे म्हणाल्या.


१९७९ साली पुणे महानगरपालिकेने ओम चॅरिटेबल ट्रस्ट बरोबरच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे गरवारे बालभवन सुरु करून पुण्यातील बालकांचे पालकत्व स्वीकारलेले आहे. याबद्दल पुणे महानगरपालिकेचे डॉ.श्यामला वनारसे यांनी अभिनंदन केले आणि आता सुजाण पालकत्वावरील दस्तावेज उपलब्ध करून देऊन पुणे महानगरपालिकेने पालकांनाही दिलासा दिला आहे, हे उल्लेखनीय आहे. तेव्हा इतर महापालिकांनीही याचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुस्तकाच्या सहलेखिका सुषमा दातार म्हणाल्या, "सध्याच्या काळात पालकत्वाचा विचार करताना माध्यमं आणि पैसा या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. व्यक्ती आणि समाज पैसाकेंद्रित झाला आहे. सध्या आपण ice_युगात आहोत. म्हणजे, Information, Communication and Entertainment. माध्यमांशी हातमिळवणी करून पालकत्व स्वीकारायला शिकायला पाहिजे. तरीही, ही साधने आहेत, साध्य नाही हे समजून घेतले पाहिजे. पालकत्वाचा मूळ पाया बालकारण हाच असतो हे विसरता कामा नये."

पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी सांगितले," प्रत्येक मूल हे एकमेवाद्वितीय असते. त्यांना त्यांच्या क्षमता अजमावून पाहायची संधी पालकांनी द्यावी. मुलांवर विश्वास ठेवावा, मुलांना आपल्यासाखं बनवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना मातीत घट्ट रुजलेली मुळं द्यावीत आणि आकाशात भरारी घ्यायला पंख द्यावेत.

गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांनी दिलेला श्राव्य-संदेश यावेळी उपस्थितांना ऐकविण्यात आला. त्यांनी त्यातून ह्या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित केले व असे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन केले.

डॉ. विदुला म्हैसकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनपाच्या समाजकल्याण उपायुक्त रंजना गगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यावेळी विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समितीच्या विद्यमान अध्यक्षा रूपाली धाडवे, सार्थक फाउंडेशनच्या स्वाती नामजोशी, कर्नल्स क्यूब चे कर्नल फुले, ओम चॅरिटेबल ट्रस्टचे श्री. राजपाठक, गरवारे बालभावानच्या सुवर्णा सखदेव व भारती सुगवेकर, संवाद पपेट ग्रुपच्या डॉ. विदुला कुडेकर, संगीता देशपांडे व प्रसन्ना हुल्लिकवी तसेच मृणालिनी वनारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या...
पुस्तकाचे प्रकाशन- उद्योजकतेचा मूलमंत्र

पुणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आणि सार्थक फाऊंडेशनच्या सहकार्याने निर्मित 'उद्योजकतेचा मूलमंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन १५ मार्च २०२१ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले," सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे महिलांना प्रत्यक्ष जमवून काही कार्यक्रम करणे शक्य नसल्याने पुस्तके काढण्याची कल्पना माझ्या मनात आली. त्यापैकी आज हे पहिले पुस्तक प्रकाशित होत आहे, यांचा आनंद वाटतो. मी स्वतः: एक उद्योजिका असल्याने, उद्योजकतेची बीजे महिलांमध्ये रूजविणे हे मला महत्वाचे वाटते. सर्वसामान्य महिलांनाही यातून उद्योगाची प्रेरणा मिळेल याचा विश्वास वाटतो." असेही त्या म्हणाल्या.

 

प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी, "महिलांनी आत्मनिर्भर होण्याची गरज प्रतिपादन केली. तसेच केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले." महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांनी अल्पावधीत म्हणजे अवघ्या साडेपाच महिन्यांच्या काळात केलेल्या प्रचंड कामाबद्दल आणि राबविलेल्या नवनवीन संकल्पनांबद्दल उमाताई खापरे यांनी माधुरीताईंचे कौतुक केले.


दे आसराच्या प्रज्ञा गोडबोले यांनी उद्योजकांसाठी उभारलेल्या प्लँटफॉर्मची व त्याद्वारे सुमारे एक लाख उद्योजकांना मार्गदर्शन मिळवून दिल्याची माहिती दिली. सार्थक फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती नामजोशी यांनी सार्थकच्या गेल्या तीन वर्षांत केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. मृणाल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या आयोजक माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. स्मिता सोहोनी, रेणू गावस्कर, कर्नल कुमार फुले आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे कलाकार सागर नेने यांचा सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण समिती उपाध्यक्षा वृषाली चौधरी, समाज विकास व समाज कल्याण अधिकारी रंजना गगे, अॅड.वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे, जयश्री तलेसरा आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कोरोनाविषयक नियम पाळून, सोशल डिस्टन्सिंग राखून कार्यक्रम संपन्न झाला.