डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

 

भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे "डॉक्टर आपल्या दारी" हा उपक्रम पुणे शहरात सुरु करण्यात आला आहे. पुणे शहरात ११ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन सुसज्ज पथकासह शहराच्या विविध भागात जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींना किरकोळ आजार असतील परंतु ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊ शकत नसतील अशा रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे. सद्य परिस्थितीत फक्त ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोळ्यांचा दाह / सुज, नाक गळणे या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातील. ही पथके प्रामुख्याने मनपाचे वतीने १५ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत सुरु करण्यात आलेली निवारा केंद्रे, मनपा शाळा, ज्येष्ठ नागरिक निवासस्थाने, गर्दी असलेल्या वसाहती, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणी जावून तसेच सोशल डिस्टन्सिंग व वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.

पुण्यातील विविध परिसरात ज्या ठिकाणी व्हॅन उभी असेल तेथे रुग्णांना येण्याची विनंती लाउड स्पीकरद्वारे केली जाईल. तपासणीच्या वेळी डॉक्टर कोणाच्याही घरी येणार नाहीत. प्रत्येक मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन मध्ये ५ जणांचे पथक असुन या पथकात मनपाकडील १ डॉक्टर, १ ऑक्झिलरी नर्स, १ रेडियोग्राफर तसेच अन्य २ कर्मचारी असणार आहेत. व्हॅनभोवती गर्दी होवू नये याकरिता गाडीसमारे फक्त ५ खुर्च्या ठराविक अंतराने (सोशल डिस्टन्सिंग) ठेवण्यात येणार आहेत व त्यानुसार उपस्थित नागरिकांची वैदयकीय तपासणी करण्यात येवून मनपाने उपलब्ध करुन दिलेली औषधे दिली जाणार आहेत. यासंदर्भात काही अडचण असल्यास अथवा मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनची मागणी असल्यास कृपया संबंधितांनी विलास राठोड-९८९०१७४००७ व शशिकांत मुनोत-९४२०४७७०५२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सदरचे फोर्स मोटर्स, भारतीय जैन संघटनेचे हे कार्य अत्यंत महत्वाचे व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मा.महापौर मुरलीधर मोहोळ व मा.आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.