शहरातील धोकादायक इमारतींबाबत महत्वाचे जाहीर प्रकटन

पुणे महानगरपालिका

जाहीर प्रकटन

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जुन्या घरांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा धोक्याच्या घरांपासून त्यामध्ये राहणा-या नागरिकांना व त्या घराच्या आसपास राहणा-या नागरिकांस तसेच ये-जा करणा-या नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचणे संभव असतो. तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या घरांची तपासणी करून धोका नाहीसा करण्याबाबतीत शक्यतो सर्व दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे.

धोक्याच्या इमारती व इमारतीतील धोक्याचा भाग उतरवून घेणे इ. करिता पुणे महानगरपालिकेकडे एक स्वतंत्र उपविभाग कार्यरत आहे. तथापि, आपापल्या मालकीच्या इमारतीसंबंधी वेळोवेळी तपासणी करून ती इज्ञारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे २६५ अन्वये प्रत्येक घरमालकाचे आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता आपापल्या इमारतींची तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनियर यांजकडून तपासणी करून घेऊन त्यांच्या सूचनेनुसार व महानगरपालिकेकडून आवश्यक ती परवानगी घेऊन इमारत योग्य प्रकारे दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे, अशी व्यवस्था संबंधित धोक्याच्या घरांच्या मालकांनी करावी, अशी सूचना या प्रकटनाद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरातील एखादी  इमारत अगर तिचा काही भाग, छप्परकाम, जिना, पटई काम इ. भाग धोक्याच्या अथवा पडावयास आला आहे असे दृष्टिक्षेपात आल्यास त्याबाबतची लेखी माहिती कोणीही नागरिकाने पुणे मनपा येथील मुख्य इमारतीतील मा. शहर अभियंता यांच्या कार्यालयात सत्वर द्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. सदरबाबत धोकेदायक घरांची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येईल.

महानगरपालिकेच्या  वतीने काही धोकादायक इमारतीची तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजि. कडून तपासणी करून घेण्यात आली आहे. त्याच्या अहवालामध्ये धोकादायक व राहण्यास अयोग्य असे नमूद केलेल्या जुन्या घरांमधील मालक/भाडेकरू/रहिवासी यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २६८ (बी) व  (सी) अन्वये राहती जागा धोका टळेपर्यंत त्वरित खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा नोटिसा बजाविण्यात आलेल्या नागरिकांनी सदर घरे त्वरित खाली करणे आवश्यक आहे. इमारत रिकामी करण्यापूर्वी त्यामधील भाडेकरू / सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटई क्षेत्र मोजून त्याप्रमाणे प्रत्येक भाडेकरू /  सदनिकाधारक व मालक / सहकारी संस्था यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी संबंधितांनी मा. कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ७, स्वा. सावरकर भवन, चौथा मजला, पुणे महानगरपालिका यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

जे नागरिक अशा धोक्याच्या नोटिसा दिलेल्या किंवा धोकादायक घरात राहत असतील तर ते नागरिक व्यक्तिश: स्वत:च्या जबाबदारीवर राहत आहे. या धोकादायक घरात राहत असताना जर काही अपघात झाल्यास पुणे महानगरपालिका अपघातास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.  तसेच अशा घराच्या मालकांनी तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजि. च्या दुरुस्ती अहवालासह दुरुस्ती प्रस्ताव दाखल करून दुरुस्तीस पुणे महानगरपालिकेची परवानगी घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

शहरातील एखादी इमारत अथवा तिचा काही भाग आकस्मिकरित्या कोसळल्यास त्याची माहिती पुणे महानगरपालिका दूरध्वनी क्र. ०२०-२५५०१००० तसेच कसबा पेठ फायर ब्रिगेड दूरध्वनी क्र. ०२०-२४५७८९५० व सेंट्रल फायर ब्रिगेड, भवानी पेठ दूरध्वनी क्र. ०२०-२६४५१७०७ तसेच १०१ वर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.

घराचा एखादा भाग धोक्याचा झाला असल्यास व सदर भागाची दुरुस्ती करणे शक्य असल्यास मिळकतीच्या मालकास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २६४(१) अन्वये दुरुस्तीची नोटीस देण्यात येते व घरमालकाने दुरुस्ती करण्याबाबत असमर्थतता दर्शविल्यास जागेवरील ऑक्युपायर/भाडेकरी यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ४४६ नुसार दुरुस्ती करून घेण्यासाठी आवश्यक नकाशे योग्य त्या कागदपत्रांसह ला. आर्किटेक्ट अथवा ला. इंजिनिअर यांच्यामार्फत प्रस्ताव दाखल केल्यास दुरुस्ती परवानगी देण्यात येते, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तथापि, अशा दुरुस्तीचे काम होईपर्यंत धोक्याच्या घरात नागरिकांनी राहू नये किंबहूना पावसाळ्याच्या काळात नागरिकांनी धोक्याच्या घरात न राहता पर्यायी  व्यवस्था अन्यत्र करणे योग्य होईल. धोक्याच्या घराबाबत दुरुस्तीसाठी मालक अथवा ऑक्युपायर/भाडेकरी यांच्याकडून येणा-या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. याबाबत काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करून घेण्यासाठी मा. कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ७, स्वा. सावरकर भवन, चौथा मजला, पुणे महानगरपालिका यांच्याबरोबर मार्गदर्शनासाठी कार्यालयीन वेळेमध्ये समक्ष संपर्क साधणे उचित होईल. पावसाळा सुरू होत असल्याने नागरिकाच्या जिवितास होणारा धोका व संभाव्य जिवित, वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सदरकामी पुणेकर नागरिकांनी पुणे महानगरपालिकेस वर नमूद केल्याप्रमाणे जरूर ते सहकार्य करावे, अशी विनंती आहे.

शहर अभियंता

पुणे महानगरपालिका