वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

नागेश्वर मंदीर 

नागेश्वर मंदिर हे राज्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याअंतर्गत नोंदणी झालेले ७०० वर्षे जुने मंदिर आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करुन त्याला मूळ स्वरुपात जतन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक महत्त्व
नागेश्वर मंदिर हे पुणे शहरातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात आहे. एकेकाळी या मंदिराजवळ एक तलाव होता व या तलावाच्या पाण्यात कुष्ठरोग बरा होत असे अशी आख्यायिका आहे. मुख्य गाभाऱ्याची रचना यादव काळातील असून गाभाऱ्याला दगडी छत आहे. भूतकाळात मंदिरात नूतनीकरण तसेच अतिरिक्त बांधकाम झाले. यापैकी महत्त्वाची घटना म्हणजे पेशवे काळात मंदिरात सभामंडप बांधण्यात आला. सावकार अबू शेलकर यांनी हा सभामंडप बांधला होता. मंदिराच्या भोवताली आता बऱ्यापैकी मानवी वस्ती निर्माण झाली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक महत्त्वाची मंदिरे आहेत. 

नागेश्वर मंदिरात महाद्वार, मुख्य मंदिर, भोवताली लहान मंदिरे आणि दोन दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या भिंतींवर देवकोष्ट आहेत आणि त्यामध्ये देवांच्या मुर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात(तसेच सभामंडपात) नंदीची मूर्ती आणि लहान शिवलिंग आहेत. याठिकाणी इतरही देवदेवतांच्या मूर्ती आहेत. यामध्ये शनि महाराज, गणपती या देवतांचा समावेश आहे. मंदिराच्या आवारात भगवान विठ्ठल, भगवान विष्णु, भगवान हनुमान आणि भगवान दत्तात्रेयांची लहान मंदिरे आहेत. नागेश्वर मंदिर हे लहान लहान मंदिरांचा एक मोठा समुह आहे. 

मंदिरातील शांततापूर्ण अद्भूत वातावरणामुळे परिसराला विशेष महत्त्व प्राप्त होते. शहरातील घनदाट वस्तीत उभे ठाकलेले मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे वेगळे ठरते. भारतीय पुरातत्व खात्याने हे मंदिर वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.