वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

नानावाडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय 

  • महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. नानावाडा ही ग्रेड १ दर्जाची ऐतिहासिक वास्तू असून सन १७४० ते १७५० दरम्यान पेशव्यांचे मंत्रिमंडळातील विश्वासू मंत्री नाना फडणवीस यांनी वाड्याचे बांधकाम केले आहे.

 

  • सवाई माधवराव पेशवे यांचे मंत्री असणारे नाना फडणवीस हे पेशवाईतील अत्यंत प्रभावी मंत्री होते. नानांनी पुणे शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावला. पुणे शहरामध्ये असणा-या विविध पेठा, आंबेगाव तलावापासून संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, बेलबाग मंदिर इत्यादी अनेक उदाहरणे त्यांच्या कर्तव्याची साक्ष देतात. शनिवारवाड्याच्या मागे नानांनी स्वत:च्या वास्तव्याकरिता नाना वाडा बांधला. नानावाड्याचे अंदाजे क्षेत्रफळ २००० चौरस मीटर आहे.
  • सध्या अस्तित्वात असणा-या नानावाड्यामध्ये ब्रिटिश कालीन दगडी बिल्डिंग व एल आकारातील मूळ पेशवाई वास्तू यांचा समावेश आहे. सागवानी लाकूड कामातील तुळ्या, खांब, दुर्मिळ मेघडंबरी, अत्यंत नाजूक कलाकुसर असणारे फॉल सिलिंग, दिवाणखाना, दुर्मिळ भित्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत.

 

 

  • नानावाडा या महत्वपूर्ण वास्तूचे जतन, संवर्धनाचे काम पुणे महानगरपालिकेतर्फे सन २०१० पासून हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये कोसळण्याच्या अवस्थेत असलेली दुर्मिळ मेघडंबरी दुरुस्ती, कचेरीचा तळ व पहिला मजला यांची दुरुस्ती इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली.
  • दुस-या टप्प्यामध्ये दिवाणखान्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. ऐतिहासिक नानावाड्याच्या दर्शनी बाजूला चुन्याचे प्लास्टर, वीट बांधकाम, कौले बदलणे लाकडी मोल्डिंग करणे, रंगकाम, सागवानी लाकडातील दरवाजे खिडक्या बसवून त्यांचे मूळ स्वरुप प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण करून देण्यात आले आहे. सदर काम मे. विशाल ऍण्ड आकाश असोसिएटस यांच्याकडून करण्यात आले आहे. सदर कामासाठी अंदाजे दीड कोटी इतका खर्च आलेला आहे.
  • ब्रिटिश कालीन गॉथिक बांधकाम शैलीतील दगडी इमारतीमधील खोल्यांमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असणा-या क्रांतिकारकांची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी व पर्यटनवाढीकरिता संग्रहालयाचे काम करण्यात येत आहे. पहिल्या फेजमध्ये तळमजल्यामधील अकरा खोल्यांमध्ये रिसेप्शन रूम, क्रांतिकारक उज्ञाजी नाईक, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारक लहुजी वस्ताद, १८५७ चे बंड (दोन खोल्यांमध्ये), आदिवसींचा उठाव, नेमस्तांची चळवळ, बाळ गंगाधर टिळक, चाफेकर ब्रदर्स व समाज सुधारक, यांच्या जीवन चरित्रावर आधारित संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.

 

 

  • सदर काम मे. इतिहास, आर्ट, आर्किटेक्चर, स्वातंत्र्यलढा इत्यादींचा विचार करून तज्ज्ञ आर्टिस्ट यांच्याकडून थीम डिझाईन करून संग्रहालयाचे काम करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या संग्रहालयाच्या कामाचा अनुभव असलेल्या मे. लोकस डिझाईन प्रा.लि. या संस्थेकडून सदर काम निविदेद्वारे करण्यात आले. संग्रहालयाचे लेखन, पटकथा, ध्वनिफित व चित्रफितीचे लेखन इ. बाबी या क्षेत्रातील अनुभवी इतिहास तज्ज्ञ यांचेकडून तपासून घेण्यात आले आहे. विषयांकित कामासाठी अंदाजे ३.५ कोटी रुपये खर्च आलेला आहे.
  • या संग्रहालयाद्वारे महाराष्ट्राच्या इतिहासातील समग्र क्रांतिलढ्याची माहिती पर्यटक व भावी पिढी यांना होणार असून पुणे शहरासाठी सदर संग्रहालय मोठे आकर्षण ठरणार आहे.