क्रीडा विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

नेहरू स्टेडियम

पुणे शहरात क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत व त्याकरिता क्रिकेटचे स्टेडियम बांधण्यात यावे या मुख्य उद्देशाने शहरातील टाऊन हॉल कमिटीची ९ एकर आणि दि क्लब ऑफ महाराष्ट्रची ५ एकर अशी चौदा एकर जागा ९९ वर्षाच्या कराराने पुणे महानगरपालिकेस मिळाली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. वसंतरावजी नाईक यांच्या शुभहस्ते रविवार दि. ३ ऑक्टोबर १९६५ रोजी भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर २० ऑक्टोबर १९६९ रोजी पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्टॅण्डस्‌चे उद्‌घाटन महाराष्ट्राचे सुप्रसिध्द क्रिकेटपटू श्री. चंद्रकांत गुलाबराव बोर्डे यांच्या शुभहस्ते झाले. या समारंभास ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार श्री.डब्ल्यू.एम.(बिल) लॉरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्टेडियमच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने सन १९७६ सालापासून आयोजित करण्यात येतात. या स्टेडियमवर सन २००५ पर्यंत एकूण १३ आंतरराष्ट्रीय सामने झाले असून त्यातील ११ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने झालेले आहेत. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २७,००० इतकी असून या मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सराव केला आहे. स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीच्या खालील बाजूस बाहेरील आवारामध्ये एकूण ३२ गाळे आहेत. विविध क्रीडा क्षेत्राशी संबंधित संस्थांना त्यांचे क्रीडा विषयक कामकाज करण्याकरिता हे गाळे अल्पदराने भाडेतत्वावर देण्यात येतात. 

पं. नेहरु स्टेडियम व मैदानाच्या नूतनीकरणाचे काम सन २०१५ मध्ये पूर्ण झाले असून मैदानाकरिता एकुण रू. २,८०,००,०००/- इतका खर्च करण्यात आला आहे. खेळाडूंसाठी तळमजल्यावरील २ ड्रेसिंग रूम अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत. इमारतीचा संपूर्ण तळमजला व दर्शनी भागाच्या नुतनीकरणासाठी खर्च रू. ९०,००,०००/- व विद्युतीकरणाचा खर्च रू. ३०,००,०००/- असा एकूण रू. ४,००,००,०००/- इतका खर्च करण्यात आलेला आहे.

मैदानाच्या नुतनीकरण व देखभालीचे काम आंतरराष्ट्रीय क्युरेटर श्री. नदीम मेमन यांचेकडून करून घेण्यात आले आहे. यापुढील काळात या मैदानावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळता यावेत याकरिताच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. क्रिकेट खेळाच्या दैनंदिन सरावासाठी खेळाडूंना सकाळी ६.३० ते ८.३० व सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० तसेच विविध क्रीडा संघटना/ संस्था यांना क्रिकेट स्पर्धांकरिता सकाळी ९.०० ते सायं ४.३० यावेळेत मैदान आठवड्यातील ५ दिवस उपलब्ध करून दिले जाते. उर्वरित २ दिवस मैदानाची देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

नेहरु स्टेडियम सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार क्रिकेट मैदान वापरासंबंधी धोरणांची अंमलबजावणी क्रीडा विभागाकडून करण्यात येते. तसेच मैदान भाडे मा. स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आकारण्यात येते व मिळणारे भाडे हे पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे साधन आहे. क्रीडा विभागाचे मुख्य कार्यालय पं. नेहरू स्टेडीयम येथील तळमजल्यावर आहे. याठिकाणी महापालिका सहाय्यक आयुक्त (क्रीडा), क्रीडा अधिकारी तसेच त्यांच्या अखत्यारितील सेवकवर्गामार्फत क्रीडा विभागाचे कामकाज सुरू आहे.

स्टेडियम वापराबाबतची नियमावली

 1. पं.नेहरु स्टेडियमच्या मैदानावर फक्त क्रिकेट सामने व सरावांनाच परवानगी देण्यात येईल.
 2. बी.सी.सी.आय., एम.सी.ए., पी.डी.सी.ए.यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा व शालेय क्रिकेट स्पर्धांना प्राधान्य देण्यात येईल.
 3. क्रिकेट सरावाची वेळ: दररोज सकाळी ६.३० ते ८.३० व संध्या ४.३० ते ६.३० अशी राहील (आठवड्यातील ५ दिवस)
 4. क्रिकेट सरावादरम्यान एका विकेटवर जास्तीत जास्त २० खेळाडूंना सराव करता येईल.
 5. क्रिकेट सराव करणाऱ्या खेळाडूंकडे क्रीडा विभागाने दिलेले अधिकृत ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
 6. क्रिकेट सराव / सामन्यासाठी लेदर बॉलचाच वापर करणे आवश्यक आहे. 
 7. एप्रिल व मे महिन्यात क्रिकेट प्रशिक्षणाकरिता एका विकेट वर जास्तीत जास्त २५ खेळाडू असतील.  
 8. क्रिकेट सामन्याकरिता व सरावाकरिता खेळाडूंकडे क्रिकेटचा मान्य गणवेष असणे आवश्यक आहे.
 9. क्रिकेट सामन्यांची वेळ स. ९.०० ते दु. ४.०० राहील.
 10. क्लब ऑफ महाराष्ट्रला क्रिकेट सामन्याकरीता प्रत्येक महिन्यातील २ शनिवार/२ रविवार व  इतर ४ दिवस असे महिन्यातील ८ दिवस मैदान उपलब्ध करुन देण्यात येईल.
 11. सरावाकरीता एका प्लॉटमधील  साधारणतः ३ पीचचा एका वेळी वापर करता येईल. 
 12. ८ पीचेसपैकी २ पीच दि क्लब ऑफ महाराष्ट्र व १ पीच पुणे मनपा क्रिकेट संघाकरिता राखीव ठेवण्यात येतील.
 13. एकावेळी एका सत्राकरिता ५ कोच जसे की, सकाळ सत्रासाठी ५ कोच व संध्याकाळ सत्राकरिता  ५ कोच मैदानावर राहतील.
 14. दर सोमवार व मंगळवार पंडीत नेहरु स्टेडियमचे मैदान देखभालीकरीता बंद राहील.