Projects

Select Projects

सार्वजनिक पार्किंग धोरण 2016

वाहतूक व्यवस्थेत वाहनतळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वसाधारण वाहन सरासरी एक तास चालते आणि ऊर्वरित २३ तास वाहनतळावर उभे असते. कोणत्याही वाहनासाठी तीन ठिकाणी वाहनतळाची सोय आवश्यक आहे, ती म्हणजे वाहनमालकाच्या घरी, कार्यालय किंवा व्यापाराच्या ठिकाणी आणि मनोरंजन सुविधांच्या ठिकाणी. पुण्यात वाहनांचा सातत्याने वाढणारा आकडा लक्षात घेता दरवर्षी ४.५ लाख वाहनतळांची गरज भासण्याची शक्यता आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करुन देणे अशक्य आहे. वाहनतळाच्या सुविधा तयार करण्यासाठी समाजाला मोठी किंमत मोजावी लागते. शहरातील वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यासाठी उपलब्ध असलेली किंवा मोकळी जागा वाहनतळांसाठी वापरण्याची मागणी करण्यात येत आहे.  वाहनतळासाठी तरतूद आवश्यकच आहे ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वाहनतळांची निर्मिती आणि त्यासाठी लागणारी जागा अत्यंत मौल्यवान आहे. नागरिकांनी ही जागा मोफत वापरता कामा नये. 

Parking Policy Image

वाहतूक नियोजन आणि वाहनतळाचे धोरण यांचा अत्यंत जवळचा संबंध असून त्याचा पर्यावरण, समाज आणि आर्थिक बाबींवर परिणाम होतो. शहराला वाहनतळांना नियंत्रित करणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे. यातून नागरिकांना विशेषतः दुचाकी आणि चारचाकी अशा वैयक्तिक वाहनांच्या वापराऐवजी सार्वजनिक वाहतूकीची साधने वापरण्यास, चालणे, सायकलिंगसाठी प्रोत्साहित करता येईल. वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामुळे अपघात, वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन वैयक्तिक वाहनांवर अवलंबून राहण्याची सवय नियंत्रणात येईल. 

वाहनांच्या संख्येनुसार सातत्याने बदलणाऱ्या वाहनतळ धोरणाऐवजी, वाहनतळाची गरज कमी करण्यासाठी काय करता येईल व इतर संबंधित विषयांवर उपाययोजना सुचविणाऱ्या धोरणाची आवश्यकता आहे.

वाहनतळ उपलब्ध करुन देताना नेमकी किती जागा उपलब्ध आहे, त्या जागेत किती मोटारी सामावून घेण्याची क्षमता आहे आणि त्याची किंमत किती आहे याचा विचार व्हायला हवा जेणेकरुन नागरिकांना वैयक्तिक वाहनांच्या वापरापासून परावृत्त करीत सार्वजनिक वाहतूक पर्यायांना अधिक मागणी वाढविण्याच्या हेतूने प्रयत्न करता येईल. वाहनतळासाठी जागा पुरविण्याची गरज आणि लोकांना सार्वजनिक वाहतूकीची शाश्वत साधने वापरण्यास प्रोत्साहन या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे आवश्यक आहे.    

वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण होईल यादृष्टीने वाहनतळाच्या जागेची निवड करणे आवश्यक आहे. अशावेळी, सर्व ठिकाणी वाहनतळाची सोय उपलब्ध करुन देण्यात येऊ नये ज्यामुळे लोकांना अपेक्षित ठिकाणी पायी किंवा दळणवळणाची इतर साधने वापरुन पार करावे लागेल. 

मोठ्या शहरात बहुतांश अंतर पार करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीच्या साधनांचा वापर व्हायला हवा, परंतु सार्वजनिक वाहतूकीच्या अभावामुळे निर्माण होणारी पोकळी ऑटोरिक्षा, टॅक्सीसारख्या इंटरमिडिएट वाहतूक साधनांमार्फत भरुन काढली जाते. या वाहनांसाठी पार्किंगचा विचार होणे आवश्यक आहे कारण सध्या ही वाहने रस्त्यांवर गिऱ्हाईकांची वाट पाहताना वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो. अशावेळी विशेषतः रेल्वेस्थानक व बसस्थानकासारख्या प्रमुख गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची तरतूद आणि संबंधित मागणीच्या व्यवस्थापनाविषयी संशोधन आवश्यक आहे.  
या धोरणामार्फत खालील उद्दिष्टे साध्य करण्याचा हेतू आहे- 

  • पर्यायी वाहतूक पर्यायांच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि मोटारींचा वापर कमी करणे (ज्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषण कमी होईल)
  • रहदारी व्यवस्थापनाच्या नव्या संकल्पनांना सामावून घेण्याची आणि रहदारीच्या समस्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता तयार करणे 
  • पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने अनुकूल उपाययोजना आखत जमिनीचा योग्य वापर करणे 

खासगी वाहनांच्या वापरापासून परावृत्त करणे, उपलब्ध वाहनतळांच्या जागेचा सुयोग्य वापरास प्रोत्साहन देणे, वाहतूक यंत्रणेत सुधारणा करण्यास मदत करणे, वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणे तयार करणे ही वाहनतळ धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाहनतळ धोरणामार्फत शहराला अधिक ‘पीपल फ्रेंडली’ आणि ‘व्हेकल फ्रेंडली’ बनविण्याचा हेतू आहे.   

पुणे महानगरपालिकेच्या वाहनतळ धोरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा