Rich Legacy

 1. पुणे महानगरपालिका इमारत

शहर नगरपालिकेचे कामकाज 1858 साली सुरु झाले आणि संस्थेने 1884 पासून उपनगरात सेवा देण्यास सुरुवात केली. सध्या पुणे शहराच्या नागरी व्यवहारांचे व्यवस्थापन करणार्‍या पुणे महानगरपालिकेची स्थापना 15 फेब्रुवारी, 1950 रोजी झाली. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचा पुतळा उभारुन त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भारतात मुलींची पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुलेंविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे.


 1. शिवाजी पूल

.स. 1919-1923 दरम्यान बांधण्यात आलेला शिवाजी पूल लॉइड्ज ब्रिज नावाने ओळखला जातो. या पुलामध्ये स्थापत्यशास्त्रातील विविध शैलींचे मिश्रण आढळून येते.


 1. घोरपडे घाट

नदीच्या काठावर वसलेला घोरपडे घाट हा शहरातील सर्वात जुन्या घाटांपैकी एक आहे. घाटावर असणारे महादेवाचे मंदीर भव्य पुरात वाहून गेले. आता मंदीराचे काही अवशेष शिल्लक आहेत. पुण्यात 1961 साली मोठा पूर आला होता. पुरात शहरातील बहुतांश पुर उध्वस्त झाले आणि डेक्कन, कर्वे रोड परिसरासह जुन्या पेठांमध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.


 1. शनिवारवाडा

पुण्यातील सुप्रसिद्ध शनिवारवाडा हा अठराव्या शतकापासून मराठा राज्यकर्ते पेशव्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. वास्तूचे बांधकाम शनिवारी सुरु झाल्याने त्याला शनिवारवाडा असे नाव पडले आहे. पहिला बाजीराव पेशव्यांच्या राज्यात इ.स. 10 जानेवारी, 1730 रोजी वास्तूची पायाभरणी झाली व त्यानंतर इ.स. 1732 मध्ये वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. अत्यंत मजबूत रचना असणार्‍या या वास्तूला  पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. शनिवारवाड्याचे उत्तरेकडे तोंड असलेले २१ फूट उंचीचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा म्हणून ओळखले जाते. शनिवारवाड्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरु झाल्यानंतर वास्तूच्या मूळ आराखड्यात अनेक बदल करण्यात आले. अखेर, भोवताली चार मोठे आणि अनेक छोटे छोटे कारंजे असणारी शनिवारवाड्याची सात मजली इमारत दिमाखात उभी राहिली.

पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात शनिवारवाड्याची इमारत उभी असून, वास्तूच्या अंगणात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वास्तूच्या अंगणात पहिले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. वास्तूच्या परिसरात ‘वारसा’ नावाचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात हाताने तयार केलेल्या पारंपरिक वस्तू, पुस्तके आणि स्मृतीचिन्हांची विक्री केली जाते. पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या अंगणात ध्वनी आणि प्रकाशाचा मिलाफ असणारा अनोखा प्रयोग सुरु केला आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार्या कार्यक्रमाचे रोज दोन प्रयोग पार पडतात. संध्याकाळी 7.15 ते 8.10 दरम्यान चालणारा पहिला प्रयोग मराठी भाषेत असतो तर 8.15 ते 9.10 दरम्यान चालणारा दुसरा प्रयोग इंग्रजी भाषेतील असतो. संध्याकाळी साडेसहापासून कार्यक्रमाची तिकीटे मिळायला सुरुवात होते.


 

 1. मुजुमदार वाडा

पेशव्यांचे सरदार निळकंठ मुजुमदार यांनी सदर वाडा 1770 साली बांधला. सध्या वाड्याचे तीन चौक शिल्लक राहीले आहेत. पेशवेकालीन स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणुन हा वाडा गणला जातो. . 


 1. फणी आळी तालीम

आळी तालीम ही शहरातील अनेक जुन्या तालमींपैकी एक आहे. व्यायामशाळांना तालीम किंवा आखाडा असे संबोधले जाते. या पारंपरिक जागांचा कुस्ती आणि व्यायामासाठी वापर केला जातो.


 1. कसबा गणपती देऊळ

कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. मानाचा गणपती म्हणून ख्याती असणार्याय कसबा गणपतीचे देऊळ शिवाजी महाराजांची आई जिजाबाईंनी बांधले. या मंदीराला दोन गाभारे आहेत. मंदिराच्या बाहेरील विटा आणि आतील फुलांचे नक्षीकाम पाहून पेशवेकाळाचे स्मरण होते. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान भाविकांमध्ये हे देऊळ प्रमुख आकर्षण असते.


 1. लाल महाल

भोसले यांनी बांधलेल्या लाल महालात शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई यांचे बराच काळ वास्तव्य होते. शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. याच वास्तूमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती.  शिवाजी महाराजांच्या अनेक शत्रुंनी महालावर चढविलेल्या हल्ल्यांमुळे आज मूळ महाल अस्तित्वात नाही. पुणे महानगरपालिकेने महालाचे पुन्हा बांधकाम करून ही वास्तू जतन केली आहे.


 1. नाना वाडा

नाना फडणवीसांनी स्वतःसाठी बांधलेला नाना वाडा हा शनिवारवाड्याच्या दक्षिणेला वसलेला आहे. नानावाड्याचे दोन भाग पडतात. 1) पेशवेकालीन वास्तु - ही ऐतिहासिक वास्तु साधारण पणे 250 वर्षे जुनी आहे. सागवानी लाकूड कामातील दरबार हॉल व मेघडंबरी, दुर्मिळ भित्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्ये आहेत. 2) ब्रिटीश कालीन दगडी वास्तु - बि‘टीश कालीन दगडी वास्तु साधारण पणे 150 वर्षे जुनी असुन गॉथिक शैलीतील वास्तुचे काम अत्यंत सुंदर आहे.


 1. भाऊ रंगारी गणपती

आयुर्वेदिक वैद्य भाऊ रंगारींनी लोकांना धार्मिक कार्यासाठी एकत्र आणण्यासाठी आपल्या मुर्तीची सार्वजनिक जागी स्थापना केली.


 1. तांबडी जोगेश्वरी

हे शहरातील अनेक पुरातन मंदीरांपैकी एक मंदीर मानले जाते. येथील देवी तांबडी जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. त्र्यंबक बेंद्रे यांनी इ.स.1545 मध्ये हे मंदीर बांधले. वर्षभर मंदीरात भाविकांची वर्दळ कायम असते.


 1. भिडे वाडा

फुलेंनी याच वाड्यात 1848 साली मुलींसाठी शाळा सुरु केली होती.


 1. बेलबाग विष्णू मंदीर

फडणवीस यांनी 1769 साली हे मंदीर बांधले होते. आता त्यांचे वंशज मंदीराचे व्यवस्थापन करतात.


 1. पुणे नगर वाचन मंदीर

नगर वाचन मंदीर हे न्या. महादेव गोविंद रानडे,  लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या प्रयत्नातून सुरु झालेले अतिशय जुने ग्रंथालय आहे. इ.स. 1848 साली ग्रंथालयाची स्थापना झाली.


 1. महात्मा फुले मंडई

1885 साली सर्व भाजी विक्रेत्यांसाठी भाज्यांची विक्री करण्यासाठी मध्यवर्ती भागात एक इमारत तयार केली. निओ-गॉथिक शैलीतील बांधकाम असणाऱया इमारतीला 1938 साली महात्मा फुलेंचे नाव देण्यात आले


 1. बुरुड आळी

भागात राहणार्‍या बुरुड समुदायावरुन या भागाला बुरुड आळी असे नाव पडले आहे. महात्मा फुले मंडईच्या मागील भागात असणार्‍या बुरुड अळीत बांबू कारागीरांची घरे आहेत. नागरिकांना या भागात वेताच्या टोपल्या, लॅम्पशेड्स, चटया, पडदे यांचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतील.


 1. तुळशीबाग राम मंदीर

अप्पाजी खिरे यांनी 1761 साली हे राम मंदीर बांधले. मंदीरात लाकूड, दगड आणि चुन्याच्या भिंतींवर विशिष्ट प्रकारचे कोरीवकाम आढळून येते. अप्पाजी यांनी मंदीरात येणार्‍या स्त्रियांना आवश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी अनेक दुकानदारांना मंदीराच्या आजूबाजूला दुकाने सुरु करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर, तुळशीबागेला सध्या अस्तित्वात असलेले स्वरुप प्राप्त झाले आहे.


 1. विश्रामबाग वाडा

विश्रामबागवाडा ही ऐतिहासिक वास्तु साधारण 250 वर्षे जुनी आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान म्हणून हा वाडा बांधण्यात आला होता. सध्या विश्रामबागवाड्यात सुप्रसिद्ध वारसा स्थळांच्या काही प्रतिकृती जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. येथे पुणे महानगरपालिकेचे पुनवडी ते पुण्यनगरी हे प्रदर्शन चालविले जाते. पुण्याचा जुना इतिहास, पेठांची माहिती या प्रदर्शनामधून आपणाला पहायला मिळते. तीन चौकी वाडा सागवानी लाकूड कामातील मेघडंबरी, दर्शनी बाजू अत्यंत सुंदर आहे.


 1. बंड गार्डन वॉकिंग प्लाझा

ब्रिटीशांनी बांधलेला बंड गार्डन पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आता हा पुल आर्ट्स प्लाझा म्हणून जतन केला आहे. पर्यटकांना येथे बसण्यासाठी जागा, फरशी आणि खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Pmc Care Master Tag: