पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

रस्ता खोदण्याबाबतचे धोरण

रस्ता खोदण्याबाबतचे धोरण

Click here to get details of Trenching policy

रस्त्यांवर खोदकामानंतरची दुरुस्तीची कामे वेळेत चांगल्या रीतीने पार पडली नाहीत तर पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि रस्त्यांचेदेखील नुकसान होते. संपुर्ण आर्थिक वर्षभरात पुणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांचे खोदकाम सुरु असते. याशिवाय, इतर अनेक कंपन्यादेखील महापालिकेच्या परवानगीनुसार उत्खननाची कामे करीत असतात. या सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेची सुरुवातीला कोणतीही अधिकृत समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे खोदकाम झालेल्या रस्त्यांवर दुरुस्तीची कामे राबविण्यासाठी वार्षिक शिस्तबद्ध योजना नव्हती.

महानगरपालिका आयुक्तांच्या पुढाकाराने यासंदर्भात सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे सर्व विभाग आणि सेवा पुरविणार्‍या संस्थांमध्ये समन्वय साधणे हा त्यामागील उद्देश आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त, महानगरपालिकेचा शहर अभियंता, रस्ते विभागाचा प्रमुख अभियंता, रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाचा अधिक्षक अभियंते, पुणे शहराच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त आणि सेवा पुरविणार्‍या बाहेरील संस्थांचे प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य असतात.

पुणे महानगरपालिकेचे विविध विभाग आणि बाहेरील संस्थांनी खोदकाम केल्यानंतर तेथील दुरुस्तीची कामे महापालिकेचा मुख्य रस्ते विभाग किंवा संबंधित प्रभाग कार्यालयांकडून हाती घेतली जातात. सेवा पुरविणार्‍या बाहेरील कंपन्या दुरुस्ती कामासाठीचे डिपॉझिट महापालिकेकडे जमा करतात. त्यानंतर, दुरुस्ती कामासाठी टेंडर काढले जाते. त्यानंतर, कंत्राटदार महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या पर्यवेक्षणाखाली दुरुस्तीचे काम पुर्ण करतो.

समस्या आणि उपाय

खोदकाम आणि दुरुस्ती सुरु असताना दरवेळी वेगवेगळ्या अटी घातल्या जातात. कामाच्या निविदेत ट्रेंच, लाईट आणि रस्ता वापरणार्‍यांच्या सुरक्षेसंदर्भातील अटी असतात. मात्र, या अटींचे पुरेसे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. तसंच, बर्‍याचदा दुरुस्तीचं काम पुर्ण झाल्यानंतरदेखील मातीचा ढिग, पाईप्स असे सामान तेथेच पडून राहिलेले असते. या कामांमध्ये शिस्तबद्धता आणण्याची गरज असून नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. तसेच, दुरुस्तीसाठी वापरल्या जाणार्‍या सामानाबाबत निकष ठरविण्याची गरज आहे. बर्‍याचदा महानगरपालिकेच्या नावाखाली अनधिकृत खोदकाम केले जाते. महापालिकेच्या देखरेख पथकाकडून अशांवर कायदेशीर कारवाई केली जाते.

‘ट्रेंचलेस’ तंत्रज्ञानाचा वापर :

खोदकामा सुरु असताना आणि त्यानंतर उद्भवणार्‍या समस्या टाळण्यासाठी ‘ट्रेंचलेस’ तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरु शकतो. बाजारात सध्या पाईपलाईन टाकणे, त्याची जागा बदलणे किंवा त्याऐवजी दुसरी पाईपलाईन टाकणे, परीक्षण, गळती संदर्भातील वैविध्यपुर्ण तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास रस्त्यावर कमीत कमी खोदकाम करावे लागते. ट्रेंचलेस डिंगिंगचे फायदे खालीलप्रमाणे-

 

 • नागरिकांच्यादृष्टीने सुरक्षित
 • वाहतुकीवर कमीत कमी परिणाम
 • रस्ता दुरुस्तीचे कष्ट कमी
 • रस्त्याचे नुकसान कमी
 • ध्वनी प्रदुषणात घट
 • नागरिकांची गैरसोय होत नाही

ट्रेंचलेस कन्स्ट्रक्शनच्या नव्या पद्धती

 • इम्पॅक्ट मॉयलिंग
 • पाईप रॅमिंग
 • ऑगर बोरिंह
 • पायलट ट्यूब
 • पाईप जॅकिंग
 • मायक्रो टनेलिंग
 • हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलींग