घनकचरा व्यवस्थापनाची वाहने

घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी उत्कृष्ट यांत्रिक उपकरणे वापरली जातात. उदाहरणादाखल खाली काही उपकरणांची माहिती दिली आहे :

 

कॉम्पॅक्टर :

कॉम्पॅक्टर म्हणजे ट्रकच्या चासीमध्ये बदल करून त्याच्या मागील भागाला वाकवून कचरा भरता येईल अशी व्यवस्था केलेले वाहन. कॉम्पॅक्टरमध्ये सेंद्रिय कचरा किंवा घनकचरा भरून त्याला विघटन करण्यासाठी जमिनीत पुरता या दष्टिने सहजपणे वाहतूक करता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

कॉम्पॅक्टरमध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

  • ए१४ क्युबिक मीटर कंटेनर बॉडी
  • मल्टीस्टेजसह एक इंजेक्टर प्लेट, उघडणे आणि बंद करणे अशा दुहेरी वापरासाठी हायड्रॉलिक सिलेंडर
  • पॅकेट प्लेट आणि कॅरिअरचा संच.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २००० नुसार कॉम्पॅक्टरद्वारे कचर्‍याची वाहतूक केली जाते. कचर्‍याच्या मानवी हाताळणीसाठी प्रतिबंध असून कॉम्पॅक्टरद्वारे कचरा हाताळला जातो.

 

रस्ता सफाई यंत्र:

6.5 घनमीटर परिसराची स्वच्छता करू शकणार्‍या रस्ता सफाई यंत्रांचा (Road Sweeper Machine) वापर करण्यात येतो. या यंत्राद्वारे आठ तासाच्या एका पाळीमध्ये ४० ते ५० किलोमीटर रस्त्याची सफाई करण्यात येते. पुणे महानगरपालिकेकडे असे एक यंत्र आहे. या यंत्राला १५० ‍एचपी, ११८ किलोवॅट आणि २६०० आरपीएम क्षमता असलेले इंजिन आहे. तर ३५०० मिलिमीटर लांबी असलेला सफाई कुंचला आहे. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पुणे शहरातील उर्वरित ३ परिक्षेत्रात असे यंत्र बसविण्याचे प्रस्तावित आहे.

 

बल्क रिफ्युज कॅरिअर:
बल्क रिफ्युज कॅरिअर म्हणजे २५१६ चासीस आणि २५ एमटी जीव्हीडब्ल्यू क्षमतेचे कचरा वाहून नेणारे वाहन आहे. या वाहनाद्वारे जास्तीत जास्त १० ते १२ मेट्रिक टन वजनाची वाहतूक केली जाऊ शकते. ओला किंवा सुका कचरा विविध ठिकाणांहून गोळा करून प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्रात पाठविण्यासाठी या वाहनाचा उपयाग करण्यात येतो.

 

डंपर प्लेसर :

 

डंपर प्लेसर हे ७०९/७१२ टाटा चासीस असलेले हैड्रोलिक स्ट्रक्चर असलेले वाहन आहे. हे वाहन ३.८ मीटरचा वर्ग एवढ्या क्षमतेचे कचरा कंटेनर वाहून नेण्यासाठी वापरण्यात येते. हे धातूचे कंटेनर शहरात १०५ ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. हे कंटेनर डंपर प्लेसरच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात येतात.

 

 

घंटागाडी :

 

ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या भागात संकलित करून वाहतूक करण्यासाठी असलेले कचरा वाहतुकीचे हे प्राथमिक वाहन आहे. ओला आणि सुका कचरा अशा दोन भागात वर्गीकरण करून कचर्‍याची जवळच्या कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी घंटागाडी वापरण्यात येते. पुणे महानगरपालिकेकडे अशा प्रकारच्या ३०० घंटागाड्या आहेत. वाहनाच्या कॅबिनमध्ये नागरिकांना कचरा संकलित करण्याचे आवाहन करण्याची सुविधा असलेली घंटागाडी घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याचे काम करते.